कुमार, किशोर, तरूण यांचे मन, मेंदू व मनगट बळकट व्हावे म्हणून छत्रपती शिवराय, गुरू गोविंदसिंह, समर्थ रामदास स्वामी तथा स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतभूमीत जन्म घेऊन संपूर्ण जीवन यासाठी अर्पित केले. या थोर विभूतींना आदर्श मानून २००५ पासून ७-८ तरूणांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात विविध प्रकारे कार्याची सुरुवात केली. आपण करावे । करवावे । आपण विवरावे । विवरवावे । दा. १९-१०-१७ या नियमाला अनुसरून कार्य चालू झाले व आज या बीजाचे एका रोपटयात रूपांतर झाले असून "राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशन" या नावाने नोदंणीकृत संस्था म्हणुन कार्यरत आहे.
ही संस्था प्रामुख्याने पुढील बिंदूंवर विशेष मेहनत घेऊन कार्य करते :
१. शहर व शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये ७ वी ते १० वी या विद्यार्थ्यांचे रक्तगट, हिमोग्लोबीन ची मात्रा तपासून त्यांना आहाराचे महत्व सांगणे यासाठी शिबिरांचे आयोजन.
२. सूर्यनमस्काराचे महत्व विशद करून सूर्यनमस्कार स्पर्धा घेणे.
३. शालेय जीवनात विविध कथा, काव्य पाठांतर केल्याने जीभ व्यवस्थीत वळून, उच्चार स्पष्ट होतात व भविष्यात फ्रेंच, जर्मन अशा परकीय भाषा शिकणे सोपे होते. यास्तव कथाकथन, पाठांतर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन केले जाते.
४. छत्रपती शिवराय म्हणजे प्रत्यक्ष धर्ममूर्ती, राष्ट्रप्रेमाचे परमोच्च शिखर म्हणून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे छोटेखानी “पुस्तक" (शिवकल्याण राजा) तयार करून त्यावर लेखी प्रश्नमंजूषेचे आयोजन करणे.
५. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा घाम व मावळ्यांचे रक्त सांडले त्या पावन गडकिल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी देणे म्हणजेच गड-किल्ले भ्रमंतीचे आयोजन.
६. स्थापत्यशास्त्राचा, गडकिल्ल्यांचा उत्तुंग अविष्कार म्हणजे राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांची उभारणी ! यातूनच प्रेरणा घेऊन शाळांमध्ये 'गडकिल्ले' बनविणे स्पर्धेचे आयोजन.
७. सर्व प्रकारच्या मॅनेजमेंटचा गुरू म्हणजे "ग्रंथराज दासबोध" ! तरूणांमध्ये दासबोध व समर्थांच्या विचारांचा प्रसार, प्रचार होण्यास्तव विविध कार्यक्रम, परीक्षा यांचे आयोजन.
८. तपश्चर्या स्थान- टाकळी नाशिक, कार्यस्थान - चाफळ, सज्जनगड, साधनास्थान - विविध घळी ( हेळवाक, चंद्रगिरी, रामघळ, शिवथरघळ ) दर्शन यात्रांचे आयोजन.
९. सहपरिवार गडकिल्ले भ्रमण यांचे आयोजन. आपण लोकांनी पारंपारिक तिर्थक्षेत्रे तर नक्कीच करावे पण सहपरिवार गडकिल्ले तिर्थ समजून जाणे आवश्यक याची जाणीव उत्पन्न करणे.
१०. शिवछत्रपती - समर्थ रामदास स्वामी यांच्या गडकिल्ले, साधनास्थाने याचे चित्रप्रदर्शन दाखविणे.
११. छत्रपती शिवरायांचे 'शिवचरित्र' घराघरात पोहचावे ही प्रेरणा पूजनीय सुनिलजी चिंचोलकर यांच्याकडून घेऊन आपल्या शहरात व अडगांव येथे भव्य दिव्य शिवचरित्राचे पाच-पाच दिवसांचे आयोजन मराठवाड्यात पहिल्यांदाच खुल्या प्रांगणात भव्य व्यासपीठावर केले गेले. ज्याचा शेवट तरूणांच्या, किशोरांच्या सहभागातून शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करून संपन्न झाले.
१२. यातुनच शिवचरित्र कथाकार यांची निर्मिती व्हावी म्हणुन प्रयत्न ! आजपर्यंत तरूणांमधून श्री. शंकर भगवान जाधव व श्री. संतोष थोरे हे शिवचरीत्र कथाकार सेवेस रूजू झाले आहेत. दोघांच्या माध्यमांतून आजपर्यंत २५ हुन अधिक ठिकाणी शिचरित्र कथन झाले आहे.
१३. आपल्याच आजूबाजुला अनेक गुणवंत अचाट कार्य करणाऱ्या व्यक्ती असतात परतूं आपले तिकडे लक्ष नसते हिच गोष्ट जाणून आपल्याच परिचीत २९ व्यंक्तींचे विविध गुण शोधुन त्या गुणाला साजेशी समर्थरचीत ओवी शोधून विशेष कौतुक पत्र तयार केले गेले, सहपरिवार एकत्रीकरण करून या गुणांचे सर्वांसमक्ष वाचन करण्यात आले व पूजनीय सुनिलजींच्या हस्ते गौरविण्यात आले.
१४. कुटूंब व्यवस्था बळकट राहावी, मुलांचे संगोपन व्यवस्थीत व्हावे म्हणून श्री श्रीकृष्ण चिंचोरकर व सौ. गीता चिंचोरकर या यशस्वी जोडप्याचे मार्गदर्शन "सहजीवन" शिबीरांतर्गत घेण्यात आले.
१५. आप्तेष्ट परिवारात एकी, सामंजस्य, संवाद राहावा म्हणुन "एकादशी उपासनेचे" आयोजन दर एकादशीला होते, ज्याचे उपासनेचे विशेष पुस्तक प्रतिष्ठानने काढले आहे.
साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले ।
अवघे मिळोन येक चि जाले । देहातीत वस्तू ।। दासबोध ७-२-३१
या समर्थवचनाला अनुसरून राधेश्याम प्रतिष्ठान इतर धार्मिक - राष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असते. उदा. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आयोजीत मुलांच्या निवासी व्यक्तीमत्त्व विकास शिबीरात सहभाग, "सहयोग" या कुटुंबवत्सल शिबीरात सहभाग, प्राणायाम योगासन शिबीराचे आयोजन, रामकृष्ण मिशन आश्रम सोबत विविध गावात होणाऱ्या वैद्यकीय शिबीरात वैद्यकीय प्रतिनिधी, केमीस्ट, डॉक्टर्स यांच्या माध्यमातून औषधी उपलब्ध करून देणे, चिन्मय शिबीरात वैद्यकीय प्रतिनिधी, केमीस्ट, डॉक्टर्स यांच्या माध्यमातून औषधी उपलब्ध करून देणे, चिन्मय मिशनच्या विविध कार्यात सहभाग, गोरक्षण परिवार समवेत विविध गोसेवा कार्यात सहभाग, पारूंडी येथील गोशाळेच्या विविध कार्यात सहभाग.
१६. गेली पाच वर्षे सर्व संत महात्म्यांनी सुरू केलेले जीवनपयोगी वस्तूंचे एकाच छताखाली एकत्रीकरण व उपलब्धता सेवा केंद्रांचे "सद्गुरू संत साहित्य सेवा" नावाने कार्य संपन्न.
१७. समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद यांच्या विविध सत्साहित्याचा पुस्तक रूपाने प्रचार, प्रसार.
१८. समर्थ रामदास स्वामींचे जीवन चरित्र चित्ररूपाने पत्रक काढून त्याद्वारे प्रचार प्रसार.
१९. कौटुंबिक सोहळ्यात (उपनयन सोहळे) अहेररूपी अर्थाजनाचा विनियोग अनाथ मुलांचा आश्रम (भारतीय समाज सेवा केंद्र), गोसेवा (गोरक्षण परिवार), दासबोध ग्रंथ छपाई (श्री रामदास स्वामी प्रतिष्ठान मराठवाडा) तसेच जिर्णोद्धार कार्य (टाकळी मठ नाशिक, भालगांव मठ बिड रोड संभाजीनगर सं. नगर) आदींसाठी अर्पण.
२०. शिवरायांच्या समर्थांच्या साहित्यांवर कुणी नविन व्यक्ती अभ्यासपूर्ण पुस्तक, लिखाण करीत असल्यास त्यास आर्थिक, इतर मदत करणे "राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशनचे" मुख्य कार्य ठरते.